परिसाचा हात
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो असे आपण नेहमी म्हणतो. पण अरुंधती मॅडम यांच्या बाबतीत थोडं वेगळं आहे. चार यशस्वी पुरुषांमागे भक्कम साथीचा हात असणारे हे व्यक्तिमत्व. या घरच्या पुरुषमंडळींसोबतच, त्यांच्या भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून त्या करत असलेलं काम आणि हजारो महिलांना विविध माध्यमातून मदतीचा दिलेला हात, उभा राहण्याची दिलेली ताकद, बहुमुल्य मार्गदर्शनाची दिलेली शिदोरी, त्यांच्या कलागुणांना दिलेलं व्यासपीठ… अजून किती सांगावं… हजारो महिलांच्या जिद्दीने उभे राहण्याच्या मागे असणारा अरुंधती महाडिक यांचा हात मला परीस वाटतो.

आदर्श मातृत्व
आपल्या पुराणातील उल्लेखानुसार अरुंधती नावाचा एक तारा देखील आहे. ताऱ्याप्रमाणेच तेजस्वी असणारं हे व्यक्तिमत्व, विचारांच्या बाबतीत, त्यांच्या कार्याच्या बाबतीत सर्वांना आपलंस करून जातं. त्याचं कुटुंब, कुटुंबावरील प्रेम हे सगळं आपण कृष्णराज यांच्या व्हिडीओजमधून पाहतच असतो. हे पाहत असताना मुलाचं वागणं, कुटुंबाप्रती असणारं प्रेम, आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो ही जाणीव यातून अरुंधती मॅडम यांनी केलेले संस्कार दिसतात. सर्वगुणसंपन्न हा शब्द टायटलला वापरताना ज्या अनेक गुणांचा विचार मी केला त्यातला हा त्यांचा आदर्शवत मातृत्व गुण.
संयमी पत्नी
धनंजय महाडिक जेव्हा राज्यसभेवर निवडून झाले तेव्हा डोळ्यातल्या अश्रूंना त्या थांबवू शकल्या नाहीत. वेळ प्रत्येकाची येते ; चांगली आणि वाईट देखील, हे त्याचं ठाम मत. अनेक अडचणी, राजकीय चिखलफेक, चुकीच्या कमेंट्स हे सगळं होत असताना मधल्या काळात न डगमगता, तोल ढळू न देता हे दाम्पत्य प्रामाणिकपणे काम करत राहिलं. सत्ता असो वा नसो माझी माणसं, माझी जनता यांच्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असणारं हे महाडीक कुटुंब. या त्यांच्या प्रामाणिक कामाच्या जोरावरच ते नेहमीच जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत आणि पुढे देखील राहतील.
भागीरथी महिला संस्था
महिला व मुलांसाठी आरोग्य शिबिर व मार्गदर्शन, हस्ताक्षर सुधारणा कार्यशाळा, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण, पर्यावरण रक्षणासाठी निसर्ग सखी कचरापेटी, किशोरवयीन मुलींसाठी ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मार्गदर्शन, स्त्री-भ्रूणहत्या विरोधी उपक्रम, होळी सणावेळी शेणी व पोळी दान, युवती मंचच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ही लिस्ट न संपणारी आहे. अरुंधती मॅडम त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून स्त्री सबलीकरणाची ज्योत पुढे घेऊन चालत आहेत.
वेळेला सर्वाधिक महत्व
पत्रकार म्हणून काम करत होतो तेव्हा बातम्यांनिमित्त भेटनं व्हायचंच. अलीकडे स्वतःचं चॅनल सुरु केल्यापासून, आणि वाढत्या व्यापामुळे प्रत्यक्ष फिल्डवर जाणं होत नाही. डिसेंबर २०२३ ला चॅनलच्या एका कार्यक्रमासाठी पाहुण्या म्हणून यावं म्हणून थेट मॅडमनाच कॉल केला. त्यांच्या बोलण्यात देखील एक वेगळी अदब आहे. “जी” म्हणत मॅडम पूर्ण माहिती ऐकत होत्या. सर विद्यापीठात एक कार्यक्रम आहे, तो आवरते आणि थोडावेळ का होईना आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावेन, असं त्यांनी सांगितलं. वेळेबाबतीत मॅडम अगदी चपखल. कार्यक्रम पत्रिकेवर दीडची वेळ होती, मी मॅडमना दोनची वेळ सांगितली होती. बरोबर १:४५ ला पीएंचा फोन आला, १० मिनिटात पोहचतो आहे. १:५५ ला म्हणजेच कार्यक्रमाच्या वेळेपूर्वी ५ मिनिटं मॅडम हजर होत्या. कार्यक्रम २ ऐवजी अडीचला सुरु झाला. या मधल्या अर्ध्यातासात अगदी घरापासून ते राजकारणापर्यंत विविध विषयांवर आमची चर्चा झाली.
विनम्र, सोज्वळ, अभ्यासू
घरच्या गोष्टी, सोशल मिडिया, ट्रेनिंग्ज, काय उपक्रम राबवता येतील. माझ्या माध्यमातून काय करता येईल यावरही बोलणं झालं आणि खासदारांची किंवा आपली कुठेही, कधीही, काहीही मदत लागली तर बोलवा मी हजर असेन इथवर बोलणं झालं. आभाळाला हात टेकत असताना, जमिनीवरती पाय भक्कम कसे ठेवावे ही मी त्या दिवशी अरुंधती मॅडम यांच्याकडून शिकलो. विनम्र, सोज्वळ स्वभाव, अभ्यासू भाषण, आतमध्ये लपलेलं भावनिक रूप, लाड करणारी आई, प्रसंगी रागे भरणारी आई, निस्वार्थी प्रेम करणारी पत्नी, सबल नेतृत्व गुण असणाऱ्या भागीरथी महिल्या संस्थेच्या अध्यक्षा, गोड सासू, प्रेमळ आजी, आपल्या मुलाच्या नावाचा टॅटू कुणीतरी पाठीवर काढलाय हे पाहताच क्षणी, त्याला किती वेदना झाल्या असतील म्हणून कळवळणाऱ्या या स्त्रीमध्ये दुर्गेचं रूप दिसतं. म्हणूनच म्हटलं सर्वगुणसंपन्न स्त्री शक्तीचं जिवंत रूप ; अरुंधती महाडिक!
– विष्णू ना. वजार्डे
(लेखक सर्च मराठी न्यूजचे मुख्य संपादक आहेत)